पुणेशहर

हिमालयातील माउंट मंदा-१ शिखरावरील पहिली भारतीय मोहीम यशस्वी

भारतीय गिर्यारोहण इतिहासातील सुवर्णक्षण

प्रतिनिधी

पुणे (२१, सप्टेंबर) – हिमालयातील केदारगंगा व्हॅलीतील माउंट मंदा-१ या ६ हजार ५१० मीटर उंच व चढाईसाठी तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक शिखरावर यशस्वी चढाई करत गिरीप्रेमीच्या शिलेदारांनी भारतीय गिर्यारोहण इतिहासात नवा अध्याय रचला आहे. ही मोहीम १८ सप्टेंबरच्या सकाळी संघाने शिखरमाथा गाठण्यात यश मिळवले.

तब्बल ३२ वर्षांनी गिरिप्रेमीच्या नव्या दमाच्या गिर्यारोहकांनी गिर्यारोहणातील कौशल्ये पणाला लावून शिखर चढाई यशस्वी केली. सतत होणारे हिमप्रपात, सोबतीला असणारे रॉकफॉलच्या आव्हानांना तोंड देत हिमभेगांना चुकवत, कधी कठीण बर्फाळ मार्गावरून तर कधी भुसभुशीत हिमांतून वाट काढत ७० ते ८० अंश कोनांतील हिमभिंतीचे व अतिशय तीव्र धारेचे आव्हाने स्वीकारत संघाने शिखरमाथा गाठला.

माउंट मंदा-१ हे सर्वार्थाने आव्हानात्मक शिखर आहे. हे शिखर गिर्यारोहकांचे अतीव परिक्षा पाहणारे आहे. येथील शिखर चढाईसाठी गिर्यारोहक मानसिक व शारिरीकदृष्ट्या अतिशय कणखर असावा लागतो. अशा आव्हानात्मक शिखरावर गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी मिळविलेले यश हे भारतीय गिर्यारोहण क्षेत्रातली एक सुवर्ण क्षण आहे, अशी माहिती ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी दिली.

धोकादायक अशा उत्तर धारेने चढाई करत गिरीप्रेमीच्या डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे व पवन हडोळे यांनी शिखरमाथा गाठला. त्यांना मिन्ग्मा शेर्पा व निम दोर्जे शेर्पा यांनी साथ दिली. माउंट मंदा-१ शिखराच्या उत्तर धारेने यशस्वी झालेली ही पहिली भारतीय गिर्यारोहण मोहीम आहे. मोहिमेतील सर्वात तरुण सदस्य निकुंज शाह याने सपोर्ट मेंबर म्हणून महत्वाची भूमिका बजावली. तसेच एव्हरेस्ट शिखरवीर आनंद माळी यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले तर ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांचे मोहिमेला मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close